शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जुनोनी

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या झरी तालुक्यात असलेले जुनोनी हे छोटस गाव. या गावाच्या भोवताल आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायकरिता शिक्षणाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून 1 नोव्हेंबर 1972 ला शासकीय आश्रम शाळा जुनोनी ची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस उच्च प्राथमिक पर्यंत असलेली शाळा 21 जानेवारी 1997 ला माध्यमिक पर्यंत वर्धित करण्यात आली.
विद्यार्थ्यांकरिता आदिवासी विकास विभागाच्या असलेल्या योजना जसे डी. बी टी. योजना, मोफत शालेय पाठ्यपुस्तके व नोंदवही, नाश्ता , दोन्ही वेळेचे जेवण , निवास , अशा अनेक योजना आमच्या शाळेमार्फत पुरवल्या जातात. शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतचा शाळेचा इतिहास बघता आज शाळेचा कायापालट झालेला आहे. बांबूंच्या ताटव्यांमध्ये सुरू झालेली शाळा आज घडीला सिमेंटच्या पक्क्या इमारतीमध्ये दिमाखात उभी आहे. आज शाळेमध्ये मुला मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्र, पाण्याच्या व्यवस्थे करिता स्वतंत्र पाण्याची टाकी, विज्ञान प्रयोगशाळा , ग्रंथालय, सुसज्ज संगणक कक्ष, सर्व वर्गाकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या, फळबाग, परसबाग, खेळाचे मैदान, सोलर लाईट , सोलर वॉटर हीटर , सिक रुम इत्यादी भौतिक सुविधांनी सज्ज अशी शाळा आहे.
यासोबतच शाळेत अंधश्रध्दा निर्मुलन शिबीर, प्रोत्साहनात्मक अनुभवी मान्यवरांचे उत्साही प्रबोधन , दिन विशेष व जयंती कार्यक्रम , व्यवसाय मार्गदर्शन शिबीर , संगणक शिक्षण , शैक्षणिक सहल वनभोजन , पालक मेळावा , आंतरशालेय निबंध स्पर्धा , सामान्य ज्ञान स्पर्धा , हस्तलिखीत निर्मिती ,कौशल्य विकास उपक्रम इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरिता ' 'प्रयास वार्षिक स्नेहसंमेलन' मोठ्या उत्साहात घेतले जातात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरता अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात जाण्याकरिता सुपर 50 बॅचेस द्वारे प्रशिक्षण दिले जाते. वर्ग 5 व 8 वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा , एकलव्य निवासी शाळेकरिता पूर्व परीक्षेची तयारी नियमित घेतली जाते. " आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक निर्माण करतो." हे ब्रीदवाक्य आमच्या शाळेची उंची दर्शवते.